नेवासा : एका साठ वर्षीय महिलेचा कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला. यानंतर तिच्या घरातील एका व्यक्तीने घरातून ठोकली. परंतु ग्रामस्थ, पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रूक येथे घडली. नेवासा तालुक्यात दीड महिन्यानंतर कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. कल्याण येथून आलेल्या साठ वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी रविवारी दिली. कल्याण येथून २० मे रोजी सदर महिला नेवासा बुद्रुक येथे आल्यानंतर तिला जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. २२ मे रोजी तिला त्रास होऊ लागल्याने प्राथमिक तपासणी करून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी आलेल्या अहवालातून सदर महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आणखी कोण, कोण व्यक्ती आल्या आहेत याची चौकशी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. संपर्कातील व्यक्तींना स्त्राव तपासणीसाठी पाठवले असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.दरम्यान, या महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध प्रशासनाने सुरू केला. त्याचवेळी महिलेच्या घरातील एका व्यक्तीने घरातून धूम ठोकली. सदर व्यक्ती गावातील स्मशानभूमीकडे पळाला. यावेळी गावातील नागरिक व पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप दहिफळे, निवृत्त आर्मी मेजर बर्डे, पोलीस मित्र संतोष गायकवाड यांनी त्याला पाठलाग करून पकडले. तपासणीसाठी त्यास रुग्णालयात पाठविलेआहे.जिल्हा परिषद शाळेची पाहणी नेवासा बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत जाऊन तहसीलदार रुपेश सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.मोहसीन बागवान, डॉ.रवींद्र कानडे, आरोग्य सेवक शंकर मालदोडे यांनी पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सोमनाथ यादव, डॉ.राहुल चव्हाण व ग्रामस्तरीय दक्षता समितीला सदस्यांना सूचना केल्या.
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तीचे पलायन; ग्रामस्थ, पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 2:21 PM