अहमदनगर : काही संघटनांनी शेतक-यांच्या दूध दर आणि इतर मागण्यांच्या संदर्भात पुकारलेल्या संपाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज विविध शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन आढावा घेतला. गृहोपयोगी वस्तू, भाजीपाला, दूध वितरणाबाबत निर्माण होणा-या परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांनी आढावा घेऊन जिल्ह्यातील परिस्थिती सुरळीत राहील, यासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.शेतक-यांच्या संपाचा अनुषंगाने जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातून बाहेर जाणारा भाजीपाला, दूध यांच्या वितरणात कोठेही अडचण येऊ नये, यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे. अत्यावश्यक सेवांच्या बाबतीत आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. शेतक-यांनीही त्यांच्या शेतमालाची तसेच दूधाची नासाडी होणार नाही, यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वाहतूक सुरळीत राहील, कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि शेतक-यांच्या शेतमालाचे नुकसान होणार नाही, यासाठी शांततामय मार्गाने सर्वांनी पुढाकार घ्यावा. शासकीय यंत्रणांनीही त्यादृष्टीने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केले आहे.बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, श्रीरामपुरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी खान, पशुसंवर्धन, दुग्धविकास, पोलीस, सहकार आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.