अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे अभूतपूर्व संकट आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय आणि नियंत्रण समितीची स्थापना करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनावर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी श्याम असावा, अजित माने, अनिकेत कौर, सुलक्षणा अहिरे, पूजा पोपळघट, शबाना शेख, शाहीद शेख, अजित कुलकर्णी, तुलशीभाई पालीवाल, मिरेन गायकवाड, अजय वाबळे, संतोष धर्माधिकारी, प्रियंका सोनवणे, प्रवीण मित्याल, विपुल शेटिया, नाना मोरे, किशोर मुनोत, महेश सूर्यवंशी, सागर फुलारी, हनिफ शेख यांच्या सह्या आहेत. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर आणि जीवनावश्यक औषधांचा तुटवडा आणि काळा बाजार, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता असलेल्या खाटांची कमी, काही खासगी रुग्णालयांकडून लावली जाणारी भरमसाठ बिले अशा परिस्थितीमुळे लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. लोकांच्या भुकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उपाशी लोकांना घरपोच अन्न दिले नाही तर कोरोना संसर्ग टाळण्याचे सर्व प्रयत्न विफल होऊ शकतात. अशा परिस्थितीत प्रशासन, सामाजिक संस्था आणि संघटना यांचे प्रतिनिधी, वैद्यकीय व्यवसायातील जबाबदार डॉक्टर्स, संवेदनशील आणि प्रत्यक्ष कृतीशील असलेले नीलेश लंके यांच्यासारखे लोकप्रतिनिधी, धार्मिक, सहकारी आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वय आणि नियंत्रण समितीकडे सध्याच्या स्थितीतील सर्व निर्णय अधिकार दिले जावेत. पालकमंत्री, इतर मंत्री, खासदार, आमदार लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपलब्ध नाहीत. प्रशासकीय अधिकारी समस्याग्रस्त लोकांशी, वैद्यकीय व्यावसायिकांशी, विविध सेवाभावी केअर सेंटरशी औषधांचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांशी संवाद आणि समन्वय ठेवताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे संभाव्य अराजकाची परिस्थिती टाळण्यासाठी समन्वय समितीचा उपयोग होईल.
---
समन्वय समितीत नीलेश लंके असावेत
आमदार नीलेश लंके हे कृतिशील लोकप्रतिनिधी आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी कठीण परिस्थितीत लोकसहभागातून उत्तम काम केले आणि सध्याही करीत आहेत. त्यांचा या समन्वय समितीत समावेश असावा. राजकीय चमकोगिरी करणारे राजकीय नेते या समितीत घेतल्यास समितीचा उद्देश विफल होईल, असेही मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.