अहमदनगर : एसटी महामंडळातील कंडक्टरकडे असलेल्या ईटीआय मशीनबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. या मशीन जुनाट झाल्याने वारंवार नादुरुस्त होतात. परिणामी प्रवासात कंडक्टरला (वाहक) मनस्ताप सहन करावा लागतो. वाहकांनी अनेकदा तक्रारी करूनही मंडळाने या मशीनमध्ये सुधारणा करण्याबाबत चालढकल चालवली आहे.
पूर्वी कागदी तिकिटांचा वेळखाऊपणा व त्या तिकिटांचा हिशेब लिहिता-लिहिता वाहकांना येणारा नाकीनऊपणा यावर उपाय म्हणून राज्य परिवहन मंडळाने तिकिटांसाठी ईटीआय मशीन आणल्या. यावर फक्त प्रवासाचा टप्पा टाकला की, त्यासाठी लागणारे पैसे व तिकीट काही सेकंदात प्रवाशाला मिळू लागले. शिवाय तिकिटांचा हिशेबही आपोआप होऊ लागला. काही दिवस वाहकांना ही प्रणाली आरामदायी वाटू लागली; परंतु आता या मशीन्स जुनाट झाल्याने वाहकांची डोकेदुखी वाढत आहे. यातील अनेक मशीनला वाहकाच्या गळ्यात अडकवण्यासाठी आवश्यक बेल्ट व कव्हर नसल्याने हे मशीन वाहकाला काखेत धरावे लागते. अनेकदा तक्रारी करूनही या मशीन दुरुस्त करण्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे.
-----------
या आहेत मशीनच्या समस्या
महत्त्वाची समस्या म्हणजे मशीनचे की-पॅड खराब झाल्याने त्यावरील आकडे दाबण्यात अडचणी येतात. यात वाहकांच्या बोटाला गठ्ठे पडले असल्याचे समोर आले आहे. अनेक मशीनचे डिस्प्ले खराब आहेत. या मशीनची चार्जिंगही दिवसभर टिकत नाही. बहुतांश बसमध्ये मशीनला चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पाॅईंट नाहीत. त्यामुळे वाहकांची गैरसोय होते.
--------------
मशीन गहाळ झाले तर भरपाई वाहकाकडून
ईटीआय मशीन प्रवासात गहाळ झाले, तर तब्बल २५ हजार रुपयांची भरपाई वाहकांकडून घेतली जाते, असे एका वाहकाने सांगितले. मुळात मशीनची किंमत एवढी नसताना महामंडळ कशाच्या आधारे ही भरपाई वसूल करते, असा प्रश्न असून अशा कारवाईच्या भीतीने वाहकांचा ताप वाढला आहे.
--------------
जिल्ह्यातील आगार - ११
सुरू एसटी बसेस - ४७३
वाहकांची संख्या - ११२५
ईटीआय मशीनची संख्या - १५५५
-------
वर्षभरात शेकडो तक्रारी
नगर जिल्ह्यात सर्व ११ आगारांतील ईटीआय मशीन दुरुस्तीसाठी नगर विभागीय कार्यालयात दुरुस्ती केंद्र आहे. नादुरुस्त मशीन येथेच दुरुस्तीसाठी येतात. वर्षभरात शेकडो मशीन दुरुस्तीसाठी येतात; परंतु नेमक्या किती मशीन दुरुस्त केल्या याबाबत आकडेवारी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय देणार नसल्याचे येथील दुरुस्ती चालकाने सांगितले.
------
गेल्या पाच वर्षांपासूनच्या या जुनाट मशीन आहेत. डिस्प्ले खराब, की पॅड नादुरुस्त, चार्जिंग क्षमता कमी अशा एक ना अनेक समस्या आहेत. अनेकदा तक्रारी करूनही कोणीही दखल घेत नाही.
- वाहक
------------
काही कारणास्तव मशीन हरवले किंवा मोठा बिघाड झाला तर मशीनची पूर्ण भरपाई वाहकांच्या माथी मारली जाते. प्रवासात अनेकदा ही मशीन नादुरुस्त झाल्याने मॅन्युअल ट्रेवरून तिकीट द्यावे लागतात. त्याचा हिशेब ठेवणे अवघड जाते.
- वाहक
------------
माहितीसाठी अधिकाऱ्यांचे वर हात
वर्षभरात किती मशीन दुरुस्तीला येतात, याबाबत माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांना विचारली असता, विभागीय नियंत्रकांच्या आदेशाशिवाय माहिती देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विभागीय नियंत्रकांना दूरध्वनी केला; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
------------
कर्मचारी संघटनेची तक्रार
ईटीआय मशीनच्या सततच्या त्रासाला कंटाळून नांदेड जिल्ह्यातील एका वाहकाने एसटी बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. या मशीन नादुरुस्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाने गंभीरपणे विचार करून उचित कार्यवाही करावी, अशी मागणी एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे एसटी कामगार संघटनेने केली आहे.
--------
फोटो - ०२एसटी डमी १,२,३,४,५