लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरासह तालुक्यात दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यासाठी एकाच आठवड्यात राज्याचे महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी रविवारी (दि.११) बैठक घेतली. त्याच आठवड्याच्या शेवटी शनिवारी (दि.१७) राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली. दोन्ही मंत्र्यांनी आढावा घेऊन पुढील दोन - तीन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होईल, असे कोपरगावच्या जनतेसह अधिकारी, डॉक्टर यांना आश्वस्त केले होते.
महसूल मंत्र्यांच्या बैठकीला ११ दिवस उलटले तर पालकमंत्र्यांच्या बैठकीला पाच दिवस उलटून गेले, तरी रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. उलट रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन मिळाला नाही, म्हणून ११ दिवसांत तब्बल ३२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे मंत्र्यांनी शासकीय थाटामाटात घेतलेल्या बैठकांमधून कोपरगावच्या पदरी पडले तरी काय ? असाच प्रश्न या बैठकांच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
कोपरगाव शहरासह तालुक्यात मागील मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात दिवसागणिक रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण सहन करावा लागत आहे. एवढे करूनही शासकीय यंत्रणा, सरकारी कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर तसेच आठ खासगी कोविड हॉस्पिटलच्या माध्यमातून रात्रीचा दिवस करून रुग्णावर उपचार करून बरे करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करीत आहेत. याच दरम्यान मागील आठवड्यापासून रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवू लागल्याने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ११ एप्रिलला कोपरगावात तातडीची बैठक घेतली. या उपाययोजनांंसंदर्भात आढावा घेतला. त्यावर समस्या सोडविण्यात येईल असे, आश्वासन दिले. त्यावर संपूर्ण आठवडा काहीच उपाययोजना झाल्या नाहीत.
त्यानंतर शनिवारी पुन्हा खुद्द राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोपरगावात बैठक घेतली. या बैठकीत येत्या दोन- तीन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होईल असे आश्वस्त करून सर्वांचे मनोबल वाढविले. मात्र, याही आश्वासनाला पाच दिवस उलटून गेले आहेत. कोपरगावातील परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. मंगळवारी तर एकाच दिवशी तब्बल १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे खुद्द राज्याच्या कॅबिनेट दर्जाच्या दोन मंत्र्यांनी बैठका घेऊनही त्यांच्याकडून एका तालुका पातळीवरील समस्या सुटणार नसतील तर येथील नागरिकांनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यानी, आरोग्य यंत्रणेने नेमकी भिस्त कोणावर ठेवायची ? कुणाचा भरवशावर या एवढ्या मोठ्या महामारीच्या समस्येवर तोंड द्यायचे ? एवढे करूनही ते अहोरात्र जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. हे करताना उपचारसाठी लागणारी साधनसामग्री, औषधे, सेवासुविधा पुरविण्यासंदर्भात खुद्द मंत्रीच अपुरे पडत असतील, तर यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही.
............
* रेमडेसिविर इंजेक्शन
रोजची सरासरी गरज - २५० ते ३००
रोजचा पुरवठा - १८ ते २०
एका इंजेक्शनसाठी मोजावे लागतात - १५ ते २० हजार
............
* ऑक्सिजन सिलिंडर
सरासरी रोजची मागणी - ३५० ते ४००
रोजचा पुरवठा - १०० ते १२०
..........
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा !
कोपरगावातील ऑक्सिजनचा पुरवठा अजूनही सुरळीत होत नसल्याने सर्वच प्रशासकीय अधिकारी दिवसरात्र प्रयत्न करून प्रसंगी व्यक्तिगत ओळखीचा, मैत्रीचा वापर करून जमेल तेथून, मिळेल तसे ऑक्सिजन सिलिंडर खासगी कोविड हॉस्पिटलला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळत आहे. सध्या कोपरगावात बुधवार व गुरुवार एवढे दोन दिवस पुरेल एवढाच साठा आहे.
............
ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा अजूनही सुरळीत नाही; परंतु पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. मात्र, गरजेनुसार सिलिंडर उपलब्ध करून दिले जात आहे. लवकरच पुरवठा सुरळीत होईल.
- प्रशांत सरोदे, सहायक घटना व्यवस्थापक, कोपरगाव