लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील वायरिंगसह विविध उपकरणे धोकादायक असल्याचा अहवाल विद्युत विभागाने दिला आहे. नवीन उपकरणांसह व वायरिंग बदलण्याचा ४ लाखांचा प्रस्ताव धूळ खात पडून असून, दोन महिन्यांत या प्रस्तावर कुठलाही निर्णय झालेला नाही. यावरून रुग्णालयांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका किती गंभीर आहे, याची कल्पना येते.
भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आग लागल्याने १० अर्भकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शासनाने शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचा आदेश दिला आहे. अहमदनगर महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात नवजात बालकांवर उपचार केले जातात. दररोज सुमारे १० ते १२ प्रसूती होतात, असे वैद्यकीय अधिका-याचे म्हणणे आहे. नवजात बालकांवरही उपचार केले जात असून, रुग्णालयातील वायरिंग जुनी झालेली आहे. विद्युत विभागाच्या अभियंत्यांनी नोव्हेंबरमध्ये रुग्णालयाची पाहणी केली. पाहणीदरम्यान रुग्णालयातील वायरिंगला ठिकठिकाणी जोड दिले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णालयातील नवीन केबल व उपकरणांसाठीचा ३ लाख ९९ हजार ९३३ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आला. हे काम करून घेण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्याचा हा प्रस्ताव होता. प्रस्ताव देऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. अंदाजपत्रकात विद्युत विभागासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र विद्युत विभागाची बिले मिळत नसल्याने ठेकेदारही काम करण्यास तयार होत नाहीत. इमारतीच्या दुरुस्तीचा वेळोवेळी देऊनही प्रशासनाकडून कामे होत नाही. रुग्णालयासाठी नवीन रोहित्रही मंजूर आहे. रोहित्राचे कामही सुरू झाले होते. मात्र हे कामही सध्या बंद असल्याने विद्युत पुरवठा कमी-जास्त होतो. त्यामुळे रुग्णालयात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...
विद्युत विभाग प्रमुखांअभावी रखडला प्रस्ताव
महापालिकेच्या विद्युत विभागाला प्रमुख अधिकारी नव्हता. विद्युत विभागप्रमुख म्हणून आर.जी. मेहेत्रे यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु त्यांनीही स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला. त्यामुळे हे पद दोन महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील केबल बदलण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली गेली नाही.
..
सूचना फोटो: आहे.