कोपरगाव : गुन्हेगारही पुन्हा चांगले जीवन जगू शकतो. त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीतून बाजूला कसे निघता येईल, यासाठी गुन्हेगारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी गुन्हेगारांचे समुपदेशन करताना म्हटले आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास टू प्लस आरोपी मोहिमेंतर्गत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांचे मनपरिवर्तन मेळावा पार पडला. यावेळी निरीक्षक देसले बोलत होते. या मेळाव्यास २३ गुन्हेगार उपस्थित होते.
देसले म्हणाले की, चांगल्या कामासाठी पोलीस नेहमीच तुमच्या मदतीसाठी तयार राहतील. त्यासाठी तुमच्याकडून गुन्हेगारीपासून बाजूला राहणे अपेक्षित असून, तुमच्या वर्तनातदेखील सुधारणा होणे गरजेचे आहे, असेही देसले म्हणाले. यावेळी दुय्यम पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, बिट अंमलदार उपस्थित होते.
..........