अहमदनगर : आमदार निलेश लंके यांचे उपोषण सुरू होऊन 24 तास उलटून गेले आरोग्य पथक उपोषणकर्त्यांची तपासणी करण्यासाठी आले नाही. रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली नाही. प्रशासनाकडून आमचे उपोषण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता सेवा केली. आताही लोकसेवेत जीव गेला तरी बेहत्तर पण उपोषण सोडणार नाही, असा निर्धार आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.आज दुपारी लंके यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात लोकप्रतिनिधींचे उपोषण सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांना आमच्याकडे येण्यास वेळ मिळाला नाही. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे. आरोग्य पथकही आमच्यापर्यंत पोहोचू दिले जात नाही. अधिकाऱ्यांना आमची भेट घेऊ दिली जात नाही. एकूणच आमचे उपोषण मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सुरक्षा व्यवस्थाही नाही
रात्री उपोषण मांडवातच आमदार निलेश लंके यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी रात्र काढली. रस्त्याकडेला हे उपोषण सुरू असताना रात्री उपोषण स्थळी प्रशासनाने कोणताही बंदोबस्त ठेवला नव्हता.
आरोग्य पथकाला कोणी अडवले
लोकप्रतिनिधी उपोषणाला बसलेले असताना जिल्हा रुग्णालयाकडून एक आरोग्य पथक उपोषणस्थळी तैनात असायला हवे होते. पण हे आरोग्य पथक कोणी अडविले, असा सवालही उपोषणकर्त्यांनी केली.
उपोषणस्थळी एकही सुविधा मिळू दिली जात नाही. येथे हजारो लोक येत आहेत. पण प्रशासनाने येथे पाणी, शौचालय याची व्यवस्था करणे आवश्यक होते. कायद्यात तशी तरतूद आहे. पण आंदोलनकर्त्यांना काहीही सुविधा मिळू दिल्या जात नाही, असा आरोप आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड यांनी केला.