श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर आता सर्वत्र अनलॉक झाले असून, सर्वत्र व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र असे असले तरी दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या अद्यापही बंद आहेत. अत्यंत महत्त्वाच्या मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर गाडीलाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
नगर जिल्ह्याच्यादृष्टीने दौंड-मनमाड हा रेल्वेमार्ग जिव्हाळ्याचा विषय आहे. याच मार्गाने नगरला दक्षिण व उत्तर भारताशी जोडलेले आहे. भाविक, लष्करातील जवान, विद्यार्थी वर्गाच्यादृष्टीने रेल्वे गाड्यांना विशेष महत्त्व आहे. शिर्डीतील साईनगर रेल्वे स्थानकावर देशातील अनेक शहरातून रेल्वे गाड्या दाखल होतात. लांब पल्ल्याच्या वरील सर्व एक्स्प्रेस गाड्या सध्या सुरू आहेत. मात्र पॅसेंजर गाड्यांना प्रशासनाने अद्यापही हिरवा झेंडा दाखविलेला नाही. एक वर्ष होऊनही या गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे त्या कायमच्याच बंद केल्याचा संशयही प्रवासी व्यक्त करत आहेत.
--------
जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे
दरभंगा-पुणे
वाराणसी-ज्ञानगंगा
नागपूर-पुणे गरीब रथ
नागपूर-पुणे एक्स्प्रेस
झेलम-एक्स्प्रेस
गोवा-एक्स्प्रेस
कर्नाटक-एक्स्प्रेस
शिर्डी फास्ट पॅसेंजर
महाराष्ट्र एक्स्प्रेस
पाटणा-पुणे
हावडा एक्स्प्रेस
------
सर्वाधिक वेटिंग
झेलम एक्स्प्रेस व कर्नाटक एक्स्प्रेसला सर्वाधिक वेटिंग असते. पुणे-पाटणा या गाडीलाही प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे गाडी सुटण्यापूर्वी १२० दिवस आधी बुकिंग सुरू होते. सर्व आरक्षित सीट फुल्ल होतात.
----------
एसीचेही वेटिंग
लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचे एसीचे आरक्षण सध्या मिळत नाही. उन्हाची तीव्रता अद्यापही कायम आहे. त्यामुळे प्रवासी एसीला प्राधान्य देत आहेत.
-----
पॅसेंजर कधी सुरू होणार?
शिर्डीहून सुटणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या दोन्ही पॅसेंजर गाड्या सध्या बंद आहेत. त्यामुळे श्रीरामपूर, कोपरगाव, तसेच नगर येथील व्यापारी वर्गाचे हाल होत आहेत. कपडे, स्टेशनरी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स तसेच इतर मालाची खरेदी ही मुंबईतून केली जाते. त्याचबरोबर पुणे-मनमाड, नांदेड-पुणे, निजामाबाद या गरिबांना परवडणाऱ्या गाड्याही सुरू झालेल्या नाहीत.
---------
केंद्र सरकारला पॅसेंजर गाड्या चालविण्यात रस नाही असे दिसते. त्यांना केवळ नफ्यातील गाड्या हव्या आहेत. मात्र रेल्वे हा सेवा उद्योग आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली पॅसेंजर गाड्या कायमस्वरूपी बंद केल्या जातील, अशी शक्यता आहे.
- रणजित श्रीगोड, ज्येष्ठ नेते, प्रवासी संघटना
------