प्रशांत शिंदे/ अहमदनगर - महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेले आंदोलन पाचव्या दिवशीही सुरुच असून आंदोलक मागण्यांवर ठाम आहेत. १५ जुलैपासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुद कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
महसूल विभागाची सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या शिफारसी प्रमाणे लागू करावा, अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती द्यावी, पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना सामावून घेण्यात यावे आदीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेचे आंदोलन सुरु आहे.
यामध्ये अध्यक्ष राजेंद्र आंधळे, माजी अध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, उपाध्यक्ष अशोक मासाळ, संतोष झाडे, स्वप्निल फलटणे, अक्षय फलके यांच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी पाचव्या दिवशी संघटनेच्या वतीने उपोषणस्थळी स्फूर्तीगीत गायले.
दरम्यान राज्य सरकारकडून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात २३ जुलै रोजी मुंबईत बैठकीचे आयोजन केले असल्याचे पत्र देण्यात आले आहे. या बैठकीत संघटनेचे पाच प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत ठोस भूमिका व निर्णय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री घेतील, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.