आज शनिवार भारतीय सौर दिनांक १३ फेब्रुवारी".....
भल्या पहाटेच्या या शब्दांनी दिवसाची सुरुवात करणारे रेडिओप्रेमी श्रोते आजच्या डिजिटल जमान्यातही आहेत आणि म्हणूनच जागतिक रेडिओ दिन साजरा करताना मनस्वी आनंद होत आहे.
२०११ साली 'युनेस्को'ने जागतिक रेडिओ दिनाची घोषणा केली आणि तेव्हापासून दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो.
रेडिओ भारतात आला १९२७ मध्ये. सोशल मीडियाच्या प्रचंड गदारोळात रेडिओचा आवाज दबला गेला असला तरी तो अजून पूर्ण बंद पडलेला नाही. हा आवाज कायम प्रसन्नचित्त ठेवण्याची जबाबदारी श्रोत्यांची, रेडिओवरील कार्यक्रमांचे सादरकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे या माध्यमात काम करणारे अधिकारी यांची आहे. विविध खासगी एफएम रेडिओ वाहिन्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये वैविध्य आणतात. पण त्यांची व्यावसायिक धोरणे श्रोत्यांच्या कानाला नकोशी वाटतात.
रेडिओचा खरा आत्मा शासनामार्फत चालवली जाणारी आकाशवाणी हाच आहे. 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे. भारतात रेडिओचे प्रसारण सुरु झाल्यापासून आकाशवाणी या ब्रीदवाक्यानुसार काम करत आली आहे. लोककलावंतांपासून शास्त्रीय कला सादर करणाऱ्या कलावंतांसाठी आकाशवाणीच्या रुपातून एक व्यापक मंच उभा राहिला. अनेक उत्तमोत्तम कलाकारांचा उमेदीचा काळ आकाशवाणीतील स्टुडिओच्या साक्षीने बहरला आहे. आकाशवाणीने नाकारलेला अमिताभ बच्चन लोकांच्या लक्षात राहतो. पण आकाशवाणीने घडवलेल्या हजारो कलावंतांपैकी एकही नाव लक्षात राहात नाही, हे दुर्दैव आहे.
सोशल मीडियाच्या हल्ल्यात टीव्हीसुद्धा घायाळ झालाय. त्यामुळे रेडिओचे तर विचारायलाच नको. पण तरी अजूनही ग्रामीण भागात, देशाच्या सीमावर्ती भागात, कुटुंबापासून महिनो न महिने दूर राहणाऱ्या फौजी बांधवांसाठी आकाशवाणी हे जिव्हाळ्याचं माध्यम आहे.
बदलत्या काळानुसार आकाशवाणीसंदर्भात सरकारची धोरणे बदलत असून, बरीच रेडिओ स्टेशन्स एक तर खासगी स्टेशन्सच्या ताब्यात चालली आहेत किंवा बंद केली जात आहेत. खासगी एफएम वाहिन्या या क्षेत्रात कलावंत घडविण्यासाठी नव्हे तर पैसे कमावण्यासाठी उतरल्या आहेत, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्यामुळे या वाहिन्यांकडून लोककलावंत घडणे, त्यांना संधी मिळणे, लोक प्रबोधनाचे कार्यक्रम सादर होणे, या गोष्टींची अपेक्षा ठेवणे सर्वथा चूक आहे.
भारतातील विविध रेडिओ स्टेशनवर गंडांतर येत असताना सरकारने कम्युनिटी रेडिओची संकल्पना सुरू केली. ही केंद्रे सुरू करण्याचा उद्देश समाजातील उपेक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणणे हा होता. पण तो कितपत साध्य झाला हा संशोधनाचा विषय आहे.
प्रसारणात तांत्रिक सुधारणा व्हावी, अत्याधुनिकता यावी, हे मान्य आहे. पण लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम असलेलं आकाशवाणी लोककलावंतांनाच पारखी होऊ नये, ही एक अपेक्षा!
- किरण डहाळे
(लेखक आकाशवाणीच्या नगरी नगरी कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत.)