लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : गेल्या वर्षीचा मार्च महिना निम्मा संपल्यानंतर भारतात कोरोनाचे संकट वाढले, त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. तोपर्यंत संगमनेरातील गणेश मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्थापना केल्या जाणाऱ्या शेकडो मोठ्या मूर्ती बनवून तयार झाल्या होत्या. आजही त्या तशाच जागेवर आहेत. कोरोना संकटामुळे यंदाही मोठ्या मूर्तींना मागणी नसल्याने मूर्तिकारांचे मोठे भांडवल अडकून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
शहरातील कुंभारआळी, इतर परिसर व तालुक्यातील काही गावांमध्ये गणेश मूर्ती बनविण्याचे एकूण ६५ छोटे-मोठे कारखाने आहेत. यातून रोजगार निर्माण झाला. कुंभार समाज बांधव या कलाकुसरीच्या व्यवसायात मोठ्या संख्येने असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे त्यावरच चालतो. अगदी सहा इंचापासून ते दहा फुटापर्यंत मूर्ती संगमनेरात तयार होतात. येथील गणेश मूर्तींना मुंबई, पुणे, नाशिक, हैद्राबाद येथे मोठी मागणी असते. यातून वार्षिक अडीच ते तीन कोटींची आर्थिक उलाढाल होते.
गेल्या वर्षी गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्थापना केल्या जाणाऱ्या मोठ्या मूर्तींना मागणी नव्हती. तेव्हा मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मे महिन्यातच व्यापारी संगमनेरात येऊन सर्व प्रकारच्या मूर्तींची बुकिंग करतात. मात्र, यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही फारशी बुकिंग झालेली नाही. गणेशोत्सव अवघ्या ९० दिवसांवर आला असताना मोठ्या मूर्तींसाठी कुणीही संपर्क केला नसल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. कारखान्यामध्ये मोठ्या मूर्ती तशाच असल्याने या मूर्तिकारांचे मोठे भांडवल त्यात अडकले आहे. अनेकांनी बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेले आहे. त्यापैकी अनेकांच्या कर्जाचे हप्ते थकले आहे.
----------
गणेश मूर्ती बनविण्याच्या कारखान्यांमध्ये वर्षभर मूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. यंदा १० सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून त्या आधी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल. अशीच अपेक्षा आहे. नाहीतर यंदाही मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मूर्तिकारांसाठी कुठलीही नियमावली जाहीर केलेली नाही. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मोठ्या मूर्ती शिल्लक आहेत. त्या संदर्भात विचार व्हावा, शासनाने आर्थिक सहकार्य करावे.
चंद्रकांत कारभारी जोर्वेकर, रा. जोर्वे, अध्यक्ष, संगमनेर तालुका गणेश मूर्तिकार संघटना
-----------
संगमनेरातील गणेश मूर्ती बनविण्याच्या ६५ छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये वर्षभर गणेश मूर्ती बनविण्याचे काम सुरू असते. अनेक मूर्तिकारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे मूर्ती बनविण्यावरच अवलंबून आहे. कोरोनामुळे यंदाही गणेश मूर्ती कारखान्यांमधील मोठ्या मूर्ती मागणी नसल्याने तशाच आहेत. त्यामुळे सर्वांचे मिळून साधारण एक कोटी रुपयांहून अधिक भांडवल अडकले आहे.
संदीप बाळासाहेब जाेर्वेकर, रा. वाघापूर, उपाध्यक्ष, संगमनेर तालुका गणेश मूर्तिकार संघटना
---------