श्रीरामपूर : चालकाच्या निष्काळजीपणामुळे अशोकनगर येथील अशोक इंग्लिश स्कूलच्या बसला मंगळवारी सकाळी अपघात झाला. झाडाला बस आदळल्याने मोठी दुर्घटना टळली. विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.माळवाडगाव-खोकर रस्त्यावर सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. खानापूर व माळवाडगाव येथील सुमारे ३० विद्यार्थी घेऊन ही बस (क्रमांक एमएच १७ एजी ४९४८) मुठेवाडगावच्या दिशेने निघाली होती. मात्र, माळवाडगावच्या पुढे अर्धा कि.मी.अंतरावर असलेल्या डाखे वस्तीजवळ वळणावर चालकाचा तोल सुटल्याने बसला अपघात झाला. भरावावर गेलेल्या या बसने रस्ता सोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर जाऊन ती आदळली.ही माहिती पसरताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. अशोक साखर कारखान्याचे संचालक बबन मुठे, पोलीस पाटील संजय आदिक, दत्तूू आदिक, बाजार समितीचे संचालक विश्वनाथ मुठे, सरपंच बाबासाहेब चिडे, गणपत आसने, कचरू आदिक, पांडुरंग शिंदे, विठ्ठल आसने यांनी पाहणी करीत संस्था चालकांना माहिती दिली.यानंतर मुळा-प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, मुख्याध्यापक रईस शेख यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांना कुठलीही इजा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पंचनामा करीत क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली.
श्रीरामपूरमधील घटना : चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांवर ओढावलेला काळ झाडावर बेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 7:29 PM