देवदैठण : सध्या कोरोनाचा फैलाव कमालीचा वाढल्याने ग्रामीण भागात घराघरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील कोरोना दक्षता समितीने सतर्क रहावे. यातून कोरोना साखळी तुटण्यास मदत होईल, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे कोविड आरोग्य मंदिरास भोसले यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
भोसले यांनी येथील कोविड रुग्णांची हितगूज करून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी अनेक रुग्णांनी सकस आहार व योग्य उपचाराबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर गावातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, बरे झालेले रुग्ण, विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेले रूग्ण व रुग्णांच्या सेवाशुश्रूशेबाबत माहिती घेतली. त्यांनी रुग्णसेवा करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले.
यावेळी तहसीलदार प्रदिप पवार, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, कृष्णकन्हैया पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश लोखंडे, ग्रा. पं. सदस्य अमोल वाघमारे, मंडल अधिकारी भाऊसाहेब साबळे, तलाठी जयसिंग मापारी, ग्रामविकास अधिकारी सुरेश इगावे उपस्थित होते. उद्योजक अतुल लोखंडे यांनी आभार मानले.