ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करायला हवा. पुढे होणाऱ्या परीक्षांचे नियोजन करतानाही हा विचार करायला हवा. प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी, नियमित व्यायाम, प्राणायाम, सकस आहार, ‘क’ जीवनसत्त्व असणारी फळे खाणे, या बाबींवर लक्ष दिले पाहिजे. कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्यास लवकर चाचणी करून निदान करून घेतले पाहिजे, तसेच कोरोना झालेल्या व्यक्तीने संपर्कात असलेल्या सर्वांना चाचणी करून घेण्यास सांगितले पाहिजे. यामुळे वाढणाऱ्या साखळीवर आपल्याला लवकर प्रतिबंध लावता येईल. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढतो आहे. ग्रामीण भागात लोक मोठ्या प्रमाणात विनामास्क फिरताना दिसून येतात. त्याठिकाणी दंडाची सक्ती होण्याची वाट पाहण्यापेक्षा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी मास्क वापरणे व सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. लसीकरण मोहीम संपूर्ण होईपर्यंत काही कालावधी लागणार आहे. हा मधला काळ मोठा संघर्षाचा असणार आहे. या काळात सगळी जबाबदारी शासनावर सोडून चालणार नाही, तर प्रत्येकाने ही आपली स्वतःची जबाबदारी समजून योग्य ती काळजी घेतली, तर कोरोनामुक्त वातावरणात आपण लवकरच जाऊ शकतो.
-ॲड. चैतन्य माधवराव पाटील,
खरवंडीकासार, ता. पाथर्डी