लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : गावपातळीवरील सत्तेचा गड आपल्याच ताब्यात राहावा यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येकाचीच धडपड सुरू आहे. विशेष म्हणजे प्रमुख पक्षांचे प्रमुख पदाधिकारीही गाव आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी आपापल्या गावातच तळ ठोकून आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सक्रिय झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यावर प्रत्येक जण आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे. राक्षसवाडी खुर्द व निमगाव गांगर्डे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. भाजपचे युवा नेते धनराज कोपनर यांच्या नेतृत्वाखाली राक्षसवाडी खुर्द या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला, तर निमगाव गांगर्डे या ग्रामपंचायतीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींनी एकत्र बसून जागांचे वाटप केले व ग्रामपंचायत बिनविरोध केली.
तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. कोठे दुरंगी, तर कोठे तिरंगी लढती होत आहेत. प्रमुख पक्षांचे पदाधिकारीही ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात कशी राहील यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ते गावातच तळ ठोकून आहेत.
यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर हे खांडवी येथे तळ ठोकून आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे हे बारडगाव सुद्रिक पॅनल करून मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील हे टाकळी खंडेश्वरी येथे गावाचा कौल आपल्यालाच कसा मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहेत. माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील यांनी चिलवडी ग्रामपंचायत प्रतिष्ठेची केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र भोसले यांनी निमगाव डाकू येथे पॅनल उभे केला आहे.
भाजपचे नेते शांतीलाल कोपनर यांना राक्षसवाडी बुद्रुक ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास अपयश आले. यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेसचे नेते कैलास शेवाळे यांनी पाटेगाव ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात कशी राहील यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. कर्जत तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष ॲड. माणिकराव मोरे यांनी मलठण ग्रामपंचायतीसाठी जोर लावला आहे.
----
दुरगाव, मिरजगावकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अशोक जायभाय यांनी दूरगाव ग्रामपंचायत आपल्याकडे कशी राहील यासाठी ते गावातच तळ ठोकून आहेत. तालुक्यासाठी सर्वांत मोठी असलेली ग्रामपंचायत म्हणजे मिरजगाव येथे विद्यमान सरपंच नितीन खेतमाळीस व माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे यांचे पॅनल समोरासमोर ठाकले आहेत. मिरजगावकर कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.