योगेश गुंड, लोकमत न्यूज नेटवर्क, केडगाव (जि. अहमदनगर) : पुणे- अहमदनगर महामार्गापासून आत तीन किमीवर असलेल्या कामरगावजवळील मावलया डोंगरावर अश्मयुगीन अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासक सतीश भीमराव सोनवणे यांनी गेले महिनाभर केलेल्या संशोधनातून डोंगरावरील अवशेष हे अश्मयुगीन असल्याचा अर्थ लावला आहे.
कामरगावच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग आहे. यातील विठ्ठलवाडीकडून अस्तगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील एका टेकडीला मावलयाचा डोंगर म्हणतात. या ठिकाणी सोनवणे यांना काही उभ्या शिळा ठेवलेल्या दिसल्या. याचा बारकाईने अभ्यास केला असता, ही वेगळीच रचना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतिहास अभ्यासक प्रा. टी. मुरुगेश यांच्या मतानुसार हे इतिहास पूर्वकालीन थडगे असावे. त्यानुसार आणखी निरीक्षण करण्यासाठी दुसऱ्यांदा गेल्या १० मार्च रोजी त्यांनी पुन्हा भेट दिली. यावेळी त्यांना काही पुरावे सापडले. त्यात सात उभ्या शिळा होत्या. त्यांची मावलया नावाने पूजा केली जात आहे. दख्खनच्या पठारावर काळ्या कातळावर शिल्प कोरलेले पुरावे नव्याने सापडत आहेत. नगर जिल्ह्यात मात्र प्रथमच असे शिल्प सापडले आहे.