पाथर्डी (जि. अहमदनगर) : आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या आहेत. परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नाही. कारण १५ वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. हरले तर ईव्हीएममुळे असा आरोप ते करतात. परंतु ईव्हीएम त्यांना हरवत नसून जनता त्यांना हरवत असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
सोमवारी सकाळी पाथर्डी येथे महाजनादेश यात्रेनिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, सुरजीतसिंग ठाकूर, माजी खासदार दिलीप गांघी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराघ्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, माजी नगराघ्यक्ष अभय आव्हाड, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्त्हणाले, 'जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. विरोधी पक्षांची अवस्था वाईट झाली आहे. त्यांना जनता मते देण्यास तयार नाही. विरोधकांनीही यात्रा सुरू केल्या असून राष्ट्रवादीच्या दोन तर काँग्रेसची सुद्धा आजपासून सुरू होत आहे. परंतु १५ वर्षाचा त्यांना काळ जनतेने पाहिला आहे. त्यामुळे जनता त्यांचे बरोबर जाणार नाही. विरोधी पक्षांची अवस्था बुद्धूू पोरांसारखी झाली असून अभ्यास करायचा नाही. नापास झाल्यानंतर पेन खराब झाला म्हणून कारणे द्यायची.'
सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली आणि ते ईव्हीएमला दोष देतात. ईव्हीएम हे मशीन आहे. ईव्हीएम त्यांना हरवत नाही तर मतदार त्यांना हरवतो. कारण, आम्ही जनतेच्या मनात घर केले आहे. पाच वर्षात आम्ही प्रामाणिकपणे कामे केली आलेल्या आव्हानांचा सामना केला व जनतेचे प्रश्न सोडविले. त्यांच्या सत्तेच्या १५ वर्षाच्या काळात जेवढी कामे झाली. त्यापेक्षा जास्त कामे आम्ही पाच वर्षात करून दाखविली. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे व येणारी २५ वर्षे सत युतीचीच येणार असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रास्तविकात आमदार मोनिका राजळे यांनी मतदारसंघातील ताजनापूर लिप्टच्या योजनेला निधी तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची मागणी केली. तो धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, 'ताजनापूरच्या दुस-या टप्प्यासाठी कमी पडणारे दीडशे कोटी रूपये देऊन ती योजना पूर्ण केली जाईल. तसेच, शासनाने ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केले आहे. त्या माध्यमातून तोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी दिल्या जातील. उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात येतील.'