अहमदनगर: केंद्रसरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा शहरी भागातही पोहोचली आहे. आज गुरुवारी ही यात्रा नगर शहरात येणार असून १५ ठिकाणी थांबणार आहे. शहरात या यात्रेचे समन्वयक म्हणून उपायुक्त काम पाहणार आहेत.
या यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री ई-बस सेवा, आयुष्यमान भारत, स्वनिधी समृद्धी, पीएम भारतीय जनऔषधी आदी योजनांची माहिती व वंचित लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. याबाबत समन्वयाची जबाबदारी मनपाचे उपायुक्त, आरोग्य अधिकारी, जलअभियंता, प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली. ज्या भागात व्हॅन थांबणार आहेत. तेथे मनपाचे अधिकारी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेची व्हॅन माळीवाडा बस बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा, माळीवाडा, केडगाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महापालिका कार्यालयाशेजारी, रेल्वे स्टेशन, महात्मा फुले चौक मार्केट यार्ड, आयुर्वेद कॉलेज चौक, दिल्लीगेट, जिल्हा रुग्णालय, कापडबाजार, चितळे रोड, लोढा हाईट्स, श्रीराम चौक, प्रेमदान चौक, प्रोफेसर कॉलनी, भिस्तबाग चौक आदी ठिकाणी थांबणार आहे.