- अण्णा नवथर अहमदनगर - अहमदनगर मतदारसंघात भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन राजीनामे दिले. त्यामुळे नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अहमदनगर शहरात पत्रकार परिषद घेतली. मात्र तेही उत्तरे देताना गोंधळून गेल्याचे दिसले.
भाजपचे शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी सुनील रासने यांनी मुंबईत जाऊन राजीनामा दिला. खासदार विखे हे कोणाचेही फोन उचलत नाहीत. त्यांच्याबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी घालवण्यासाठी त्यांनी डाळ साखर वाटण्याचा प्रयत्न केला. भाजप देशात 400 जागा जिंकेलही मात्र नगरची जागा पक्ष गमावणार आहे. याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना चिंता वाटते. त्यामुळेच विखे यांना उमेदवारी देऊ नये अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्याची दखल घेतली नाही. अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे आम्ही पदांचे राजीनामे देत आहोत. पक्षाचे सदस्य म्हणून कार्यरत राहू, असे रासने यांनी सांगितले. अनेक पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात सविस्तर भूमिका विशद करून तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिले आहे.
दरम्यान, या राजीनाम्याबाबत भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी अहमदनगर येथे मंगळवारी पत्रकार परिषद घेत खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही याबाबत काही सांगता आले नाही. 'राजीनामा हे पत्र काय आहे, हे आम्हीच अजून पाहिलेले नाही. या पत्राची शहानिशा करून खुलासा करू ' असे ते म्हणाले. तसेच या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशचे प्रदेश सचिव अरुण मुंडे हेही उपस्थित होते. ते शेवगाव तालुक्यातील आहेत. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनाही सविस्तर माहिती देता आली नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारताच मुंडे फोन आल्याचे कारण सांगून पत्रकार परिषदेतून निघून गेले. दरम्यान, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, शेवगाव पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. याबाबत आपण बोलणे उचित होणार नाही