महावितरण कंपनीने डी. पी. बंद करून शेतीपंपाचे वीजबिल वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसताना वीजबिल वसुलीसाठी मानसिक छळ चालू केला आहे. शेती पंपाचे वीजबिल भरा नाही तर डी. पी. बंद, अशी सक्ती लावली आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता वीज पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आपले सरकार हिसकावून घेत आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली. गारपीट झाली. सरकारी यंत्रणेने पंचनामे करून सरकारने अनुदान जाहीर केले. शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात वाहून गेला. अजूनही अनुदान आले नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी वेळेवर मिळत नाही. गावात येणारा तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, वायरमन हे सर्व शेतकऱ्यांना किती तत्काळ सेवा देतात. डी. पी. नादुरूस्त होणे, वीज तारा तुटल्यास सर्व खर्च शेतकऱ्यांना वर्गणी करून करावा लागतो. एवढे करून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, असेही निवदेनात म्हटले आहे.
निवेदनावर क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, गोरक्षनाथ म्हसे, संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, नवनाथ ढगे, संदीप उंडे, शेखर पवार, राजेंद्र पेरणे, अर्जुन म्हसे, विजय म्हसे, मंजाबापू म्हसे यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.