निघोज : गेल्या पंधरा दिवसांपासून निघोज (ता. पारनेर) गावातील नळ पाणी पुरवठा योजना बंद पडून निघोज व परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे संदीप पाटील फाउंडेशनने टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू करून गावकऱ्यांची तहान भागविण्यास सुरूवात केली आहे.ज्येष्ठ नागरिक कारभारी वराळ व माजी सैनिक बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पाण्याच्या टँकरचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक सचिन वराळ, ग्रामपंचायत सदस्य भीमराव लामखडे, मंगेश लाळगे, भास्कर वराळ, संतोष इधाटे, ग्रामपंचायत सदस्या शीतल वराळ, सुमन लोहकरे, बाबाजी वाघमारे, निलेश घोडे तसेच ग्रामस्थ व महिला, संदीप पाटील फाउंडेशनचे सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सचिन वराळ म्हणाले, गेल्या १५ दिवसांपासून गावास पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी नाही. यासाठी लवकरात लवकर कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली आहे. गावची लोकसंख्या पंचवीस हजारपेक्षा जास्त आहे. गावात अल्पसंख्याक समाजाची संख्या जास्त आहे. नळ योजना बंद पडल्याने ग्रामस्थांना दूर अंतरावरील विहिंरीवरुन पाणी आणावे लागते. व्यवसाय, रोजगार पाहून लांबून पाणी आणणे शक्य होत नाही. यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याचा टँकर सुरू केल्याचे ते म्हणाले.