कोपरगाव : शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी होणा-या आर्थिक खर्चास मंजुरी देण्याच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आक्रमक झाल्याने गुरूवारी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. हा विषय तहकूब केल्यावर वातावरण शांत झाले.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची ५ तास सर्वसाधारण सभा चालली. उपनगराध्यक्ष विजय वाजे, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, नगर अभियंता विजय पाटील, कार्यालयीन सहाय्यक विनोद पाटील, सोपान शिंदे आदी उपस्थित होते. सभा लिपिक बाळासाहेब जोशी यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. कार्यारंभ आदेशानंतरही मुदतीत कामे सुरू न करणा-या ठेकेदारांवर कारवाई करावी, अतिक्रमण खर्चास मंजुरी, गाळे भाडेवाढ, पालिकेच्या आर्थिक हितास बाधा आणणा-या विषयांना प्रशासनाची मान्यता घ्यावी, या मुद्यांवरून एकमेकांना टार्गेट करणा-या भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.अतिक्रमण खर्चास जाधव यांनी कडाडून विरोध केला. वाजे यांनी माझे नगरसेवकपद गेले तरी चालेल, पण आधी विस्थापितांचे पुनर्वसन करा, मगच अतिक्रमण काढा, असे म्हणत विरोध दर्शविला. पाणी पुरवठा सभापती स्वप्निल निखाडे यांनी देखील दुजोरा दिला. वर्पे यांनी शहरातील इतर जागा शोधून १ हजार ४०० विस्थापितांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. दरेकर यांनी शहर विकास आराखड्यातील वाणिज्य जागांवरच खोका शॉप देता येतात, असे सांगितले. वहाडणे यांनी राजकारण न करता विस्थापितांसाठी खोका शॉप देण्यासाठी किरकोळ दुरूस्ती करून इतर जागांचा शोध घेण्याचे आश्वासन दिले. मंदार पहाडे व शिवाजी खांडेकर यांनी शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पाणी देण्याची मागणी केली. आरोग्य सभापती अनिल आव्हाड यांनी मांडलेल्या भटक्या जनावरांच्या प्रश्नावर वहाडणे यांनी कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. जाधव यांनी त्यांच्या प्रभागातील रस्त्याचे ४ महिन्यांर्पूाी भूमिपूजन होऊनही काम सुरू न झाल्याचे सांगत अधिका-यांना फैलावर घेतले. रवींद्र पाठक यांनी विकास कामात राजकारण नको, असे सांगत झोपडपट्टीत स्वच्छता होत नसल्याचे म्हटले.
अतिक्रमण काढण्याच्या खर्चावरून कोपरगाव पालिकेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 6:55 PM