राजूर : चोर समजून मजुरांनाच बेदम मारहाण करण्याची घटना कोल्हार-घोटी रस्त्यावरील कातळापूर शिवारात शनिवारी रात्री घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोले तालुक्यात चोरीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांतील तरुण ग्रामस्थ रात्रीच्या वेळी गस्त घालत असतात. यात रस्त्याने जाणाऱ्या -येणाऱ्या अनोळखी व्यक्तींचीही विचारपूस होते. असाच प्रकार शनिवारी रात्री कातळापूर शिवारात घडला. पुणे जिल्ह्यातील खालीद खान, निलेश भोज, रज्जाक शहा आणि इबरारा खान हे मजूर आदिवासी भागात एका ठेकेदाराकडे काम करतात. हे मजूर काम आटोपून रात्री उशिराने गावाकडे जाण्यासाठी निघाले असताना कातळापूर शिवारात आल्यानंतर रस्त्याने गस्त घालणारे शिवारातील काही ग्रामस्थ फिरत होते. त्यांच्याकडे काठ्या वगैरे होत्या. ते पाहून हे मजूर भयभीत झाले व त्यांनी पळ काढला. त्यांना अडवत ग्रामस्थांनी या मजुरांना चांगलेच बदडले. यात एक जण गंभीर जखमी झाला. झालेली घटना यांनी ठेकेदाराला सांगितल्यानंतर इतरांच्या मदतीने त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या ठेकेदाराने त्या चारही मजुरांना संगमनेरला हलविले. गैरसमजातून हा प्रकार घडल्याची चर्चा राजूरमध्ये दिवसभर सुरू होती.दरम्यान, चोरीच्या प्रकाराबाबत अफवा पसरवू नये, कोणी संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्याची संयमाने विचारपूस करावी. त्यांना मारहाण न करता पोलिसांच्या ताब्यात द्यावे. पोलीस शहानिशा करून योग्य ती कारवाई करतील. अफवांवर विश्वास ठेवू नका, रात्रीच्या वेळी गस्त घालताना संशयित आढळल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी पोलीस स्टेशनच्या वतीने केले आहे. (वार्ताहर)
चोर समजून मजुरांनाच मारहाण
By admin | Published: September 07, 2014 11:29 PM