श्रीरामपूर : विवाहेच्छुक तरुणांचा बनावट नवरीशी विवाह करून देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या राज्यव्यापी टोळीचा श्रीरामपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली आहे. तसेच फसवणूक झालेल्या तरुणांनी फिर्याद देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुजाता शेखर खैरनार, ज्योती ब्राम्हणे, अनिता कदम (सर्व रा. दत्तनगर, ता. श्रीरामपूर) व जयश्री ठोंबरे (रा. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या चार आरोपींसह एकूण दहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी शहर पोलीस ठाण्यात याविषयीची फिर्याद दिली आहे. बुधवारी शहर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मनोज पाटील यांनी याविषयीची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक आयुष नोपाणी उपस्थित होते.
मालेगाव येथील मोतीनगर भागातील एका विवाहित तरुणीची विक्री करण्यात आल्याचा प्रकार १५ जानेवारी रोजी समोर आला होता. या विवाहितेच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आपल्या पत्नीला १ लाख २० हजार रुपयांना विकण्यात आले. ही विवाहिता दत्तनगर येथे बहिणीकडे राहण्यासाठी आली असता, शेजारील एका महिलेने पत्नीला केटरिंगच्या कामासाठी नेले व तेथून ती इंदोर येथे कामानिमित्त गेली. मात्र, ९ डिसेंबरपासून ती घरीच परतली नाही, असे विवाहितेच्या पतीने फिर्यादीत म्हटले होते. मात्र, असे असले तरी प्रथमदर्शनीच हे काहीतरी वेगळे प्रकरण असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केला असता, इंदोर येथील तरुणाला विवाहात अडकवून फसविल्याचे समोर आले. श्रीरामपूर येथील चार तरुणांची या टोळीने फसवणूक केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी हे प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. मात्र, प्रतिष्ठेला तडा जाईल, या भीतीने कोणीही पुढे येत नाही, अशी माहिती मनोज पाटील यांनी दिली. या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. अजूनही अनेक आरोपी रडारवर आहेत. मात्र, गुन्ह्याच्या तपासाकरिता गुप्तता पाळण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
------------
गुन्ह्याची नवीन पद्धत
यापूर्वीही शहरात बनावट नवरीचे एक प्रकरण समोर आले होते. त्या गुन्ह्यातील आरोपींची या नव्या गुन्ह्यात माहिती घेतली जाईल. आर्थिक लूट करण्यासाठी गुन्ह्याची ही नवीन पद्धत असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले.
-----------