लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर शहरात एकमेकांचे पारंपरिक विरोधक म्हणून शिवसेना- राष्ट्रवादीकडे पाहिले जाते. हा विरोध महापौर निवडणुकीने काहीसा मावळला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी ही एकी झाल्याचे दिसते. तसेच आगामी निवडणुकांच्या रणनीतीचा हा एक भाग असू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी काळात या सर्वपक्षीय सहमती एक्स्प्रेसचा कुठल्या दिशने प्रवास होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नगर शहराच्या राजकारणात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी, असा गेल्या अनेक वर्षांपासूनचा संघर्ष आहे. केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडामुळे सेना- राष्ट्रवादीतील संघर्ष चांगलाच पेटला होता. सध्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केडगाव हत्यांकाडातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर केलेला घाणाघाती आरोप राष्ट्रवादी विसरलेली नाही. म्हणूनच राज्यात महाविकास आघाडी असली तरी नगरमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र येणे कदापि शक्य नाही, अशी अटकळ बांधली जात होती. ही वस्तुस्थितीही आहे. परंतु, विधानसभा निवडणूक संग्राम जगताप शिवसेनेकडून लढविणार, अशा बातम्याही येत होत्या. पण, राजकीय चक्रे फिरली आणि जगताप यांनी राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढविली. सेनेचे उपनेते स्व. अनिल राठोड यांचा पराभव करून ते विधानसभेतही पोहोचले. पुढे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. महाविकास आघाडीने सेना- राष्ट्रवादीतील पिढ्यान्पिढ्यांचे वैर संपविले. राज्यातील राजकीय परिस्थिती काहीही असली तरी नगरमध्ये मात्र राष्ट्रवादीचा सामना शिवसेनेशीच होता आणि पुढे राहील, असा एक मतप्रवाह आहे. शिवसेनेला महापालिकेच्या माध्यमातून आगामी विधानसभेचा गड सर करायचा आहे. आघाडी असली तरी ज्याला त्याला आपला पक्ष वाढविण्याचे संपूर्ण स्वातंत्र आहे. तसे ते शिवसेनालाही आहे. ही सेनेची अपेक्षा करणे गैर नाही. सेनेवर अंकुश राहावा, यासाठी राष्ट्रवादीने पूर्वाश्रमीचे सेनेत असलेले गणेश भोसले यांची उपमहापौरपदासाठी निवड केली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सेनेतील एका गट आधीच जगताप यांच्या विरोधात आहे. हा विरोध महापाैर निवडणुकीत शेवटपर्यंत दिसला. तो यापुढेही दिसेल, असे दिसते. सेनेचा दुसरा गट जगताप यांच्या बाजूने आहे. हा गट जगताप यांच्यासोबतच राहतो की महापालिकेच्या माध्यमातून वेगळी भूमिका मांडतो, ते या पुढील काळात दिसेल. त्यात गतवेळी राष्ट्रवादीने सेनेला सत्तेेबाहेर ठेवून भाजपचा महापौर बसविला. भाजपने अडीच वर्षे सत्ता उपभोगली. गतवेळी राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली. यावेळी शिवसेनेसोबत आघाडी केली, यातून राष्ट्रवादीने नेमकं काय साध्य केले, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नूतन महापौर, उपमहापौरांच्या कार्यकाळात विधानसभा, लोकसभा आणि त्यानंतर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सत्तेत सहभागी होणे, नगरसेवकांच्या हिताचे आहे, तर काहींना महापालिकेच्या माध्यमातून विधानसभेत पोहोचायचे आहे. त्यामुळे नगर शहरातील हे सहमतीचे राजकारण यशस्वी होईल का की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, हे पाहावे लागेल.
...............
महापालिकेत राष्ट्रवादीचा वरचष्मा राहणार का ?
गतवेळी राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. परंतु, विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच राष्ट्रवादीने स्थायी समितीही ताब्यात घेतली. दोन्ही पदे सध्या राष्ट्रवादीकडे आहेत. गणेश भोसले यांच्या रूपाने आता उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आले आहे. त्यामुळे महापौर शिवसेनेचा असला तरी महापालिकेत राष्ट्रवादीचाच वरचष्मा आहे. तो पुढील काळात राहील की राष्ट्रवादीला पदे सोडावे लागेल, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
...
कोणता झेंडा घेऊ हाती?
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक एकमेकांविरोधात लढले. परंतु, महापालिकेत सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बसपा हे पक्ष एकत्र आले आहेत. सगळेच एक झाल्याने अनेक आजी - माजी नगरसेवकांची अडचण झाली आहे. ही अडचण दूर करण्यासाठी ते पर्याय शोधू लागले आहेत. त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती, असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
---
फोटो- महापलिका