तळेगाव दिघे(संगमनेर) : भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढवावी, या मागणीकडे लक्षवेधण्यासाठी सत्याग्रही नेते अॅड. कारभारी गवळी व अभियंता हरीश चकोर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याच्या जलसंपदा खात्याचे सचिव अविनाश सुर्वे यांची सोमवारी मुंबई येथे भेट घेतली. कालव्यांची वहनक्षमता वाढवावी तसेच भोजापूर पूर चारीची दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन भोजापूर उंचीवाढ आंदोलनाच्या शिष्टमंडळाने जलसंपदा सचिवांना दिले.संगमनेर व सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी भोजापूर धरणाची उंची वाढवावी, अशी आग्रही मागणी सुरु आहे. याप्रश्नी काही दिवसांपूर्वी धरणे आंदोलन करण्यात आले होते. या मागणीचा पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे. भोजापूर धरण उंचीवाढ आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई (मंत्रालय) येथे जलसंपदा खात्याचे सचिव अविनाश सुर्वे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. भोजापूर धरणाची उंची तीन मीटरने वाढवावी, मुख्य कालव्याची वहनक्षमता ३०० क्यूसेक करावी तसेच तळेगाव भागातील पूर चारीची दुरुस्ती करावी याकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले.यावेळी सत्याग्रही नेते अॅड. कारभारी गवळी, इंजि. हरीश चकोर, डॉ. अभय बंग, अशोक सब्बन भीमराज चत्तर, विनायक गुंजाळ, किसन चत्तर, अशोक वाकचौरे, शाहीर कान्हू सुंभे, रामकृष्ण कांडेकर, चंद्रभान कांडेकर, विठ्ठल सूरम, विवेक धोत्रे उपस्थित होते. याप्रश्नी जलसंपदा सचिव अविनाश सुर्वे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे अॅड. कारभारी गवळी व हरीश चकोर यांनी सांगितले. भोजापूर धरणाची उंची वाढविल्यास सिन्नर तालुक्यातील १६ तर संगमनेर तालुक्यातील निमोण, सोनोशी, पिंपळे, नान्नजदुमाला, तळेगाव दिघे, काकडवाडी, पारेगाव खुर्द, पारेगाव बुद्रुक, तिगाव या नऊ दुष्काळपिडीत गावांना पाणी मिळू शकेल, असे भोजापूर धरण उंचीवाढ आंदोलकांचे म्हणणे आहे.