बंगल्यात कंपाउंडर शिवाय इतर कुणीही राहत नसल्याचा चोरट्यांनी फायदा घेतल्याचे दिसून येते.
चापडगाव (ता. शेवगाव) गावठाणमध्ये शेवगाव-गेवराई मार्गालगत डाॅ. ज्ञानेश्वर आंबादास दहिफळे यांचा तीन मजली बंगला आहे. डाॅ.दहीफळे हे पत्नी नलिनीच्या प्रसूतीनिमित्त दहा दिवसांपासून आपल्या कुटुंबासह अहमदनगर येथे गेलेले होते. येथील बंगल्यात कंपाउंडर बाजीराव पातकळ हा एकटाच राहत असे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचा पाठीमागील लोखंडी शटर व चॅनेल गेटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी काही चोरटे जवळील शेतात उभे होते. आत प्रवेश केल्यावर चोरट्यांनी तळ मजला, पहिल्या मजल्यावरील दवाखान्याची ओपेडी कक्ष, दुसऱ्या मजल्यावरील राहत्या खोल्या व तिसऱ्या मजल्यावरील स्टोअर रूममधील सामानाची उचकापाचक केली. बेडरूममधील साहित्याची उचकापाचक करून चोरट्यांनी त्यातील ५ सोन्याच्या अंगठ्या, गंठण, चैन असे अंदाजे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, बॅगेतील ५०० परकीय डाॅलरसह रोख ८० हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला.
सदरील प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, पाच ते सहा चोरटे दिसून आले आहेत. चोरट्यांनी येथून पळ काढताना जवळीलच रेवणनाथ भिसे यांच्या घराचा दरवाजा व खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कंपाउंडर झोपत असलेल्या खोलीचा चोरट्यांनी बाहेरून दरवाजा बंद केला होता. कंपाउंडर बाजीराव पातकळ यांस पहाटे ६ वाजता उठल्यावर चोरी झाल्याचे समजले. तेव्हा त्यांनी डाॅ. दहीफळे व गावातील नागरिकांना फोनवरून सांगितले. सकाळी घटनेची माहिती मिळताच शेवगावचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस काॅन्स्टेबल बबन राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. नगरहून ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने बंगल्याच्या पाठीमागील शेतातून उत्तरेस महालक्ष्मी मंदिरापर्यंत शेतवाटेने साधारणतः पाचशे मीटर माग काढला. तेथून चोरटे वाहनातून पसार झाल्याचे पोलिसांचा अंदाज आहे.
....
भय इथले संपत नाही...
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात बोधेगावसह बालमटाकळी, गोळेगाव, शेकटे आदी ठिकाणी चोरट्यांनी भरदिवसा घर फोडले आहे. परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. गर्भवती महिलेस मारहाण ते गोळीबार करण्याइथपर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. मात्र अद्याप चोरट्यांचा तपास लागलेला नाही. यामुळे भय इथले संपत नाही अशी विदारक परिस्थिती दिसून येते.
...
फोटो-१९बोधेगाव चोरी
...
ओळी-चापडगाव येथील डाॅ. ज्ञानेश्वर दहिफळे यांच्या घरातील सामानाची चोरट्यांनी केलेली उचकापाचक.