पारनेर : सेनेचे पारनेर तालुका प्रमुख निलेश लंके यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून, भाळवणी येथील विकास रोहकले यांची तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पारनेरचे आमदार विजय औटी यांच्या अभिस्तचिंतन सोहळ्यात सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर निलेश लंके यांनी स्वतंत्र शक्तिप्रदर्शन केले होते़ तसेच आमदार विजय औटी यांच्या वाहनावर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या प्रकाराची ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली होती. मंगळवारी रात्री सेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी लंके यांची तालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी करून आमदार विजय औटी यांचे कट्टर समर्थक विकास रोहकले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कळविले आहे. दरम्यान लंके यांच्या हाकापट्टीनंतर राळेगण थेरपाळ येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख, युवासेना उपशाखा प्रमुख आदींनी सामुहिक राजीनामे दिले असल्याचे वृत्त आहे.