कोरोना प्रादुर्भावाच्या आधी जिल्हा रुग्णालयात महिन्याला ३५० ते ४०० शस्त्रक्रिया होत होत्या. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मार्चपासून येथील नेत्रशस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने गरजू रुग्णांसाठी तत्काळ डिसेंबरपासून पुन्हा नेत्रशस्त्रक्रिया सुरू केल्या. या वर्षी मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा नेत्रशस्त्रक्रिया बंद कराव्या लागल्या. त्यामुळे गरीब, गरजू रुग्ण कोरोना संपून कधी शस्त्रक्रिया सुरू होणार याच्या प्रतीक्षेत आहेत.
------------------
तीन महिन्यांत ४९५ रुग्णांवर शस्त्रक्रिया
मागील वर्षी डिसेंबर महिन्यांत जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभाग सुरू करण्यात आला. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत ४९५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अपघातात डोळ्याला मार लागला, तसेच शस्त्रक्रियेची तत्काळ आवश्यकता आहे, अशा रुग्णांवर सध्याही जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे नेत्र विभागप्रमुख डॉ.भूषण अनभुले यांनी सांगितले.
------------------------
रुग्णांवर नियमित नेत्रशस्त्रक्रिया होत होत्या. मात्र, कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढल्याने मार्चपासून नियोजित शस्त्रक्रिया बंद कराव्या लागल्या. नेत्र विभागातील काही डॉक्टरांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, ज्या रुग्णांना तत्काळ शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना महात्मा फुले योजनेंतर्गत इतर हॉस्पिटलमध्ये पाठविले जाते.
- डॉ.भूषण अनभुले, नेत्र विभागप्रमुख, जिल्हा रुग्णालय
---------------------------
मला तीन महिन्यांपासून डोळ्याची शस्त्रक्रिया करायची आहे. मात्र, कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया बंद असल्याने वाट पाहावी लागत आहे, तसेच अशा परिस्थितीत रुग्णालयात जाणेही योग्य ठरणार नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपण्याची वाट पाहत आहे.
- कमल सरोदे, रुग्ण
-----------------------
तीन ते चार महिन्यांपासून एका डोळ्याला त्रास होत असल्याने डोळे तपासून घ्यायचे आहेत. मात्र, सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने रुग्णालयात येण्याची भीती वाटते. त्यामुळे कोरोना संपल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये येणार आहे.
- मंदाकिनी तुपे रुग्ण
-----------------
२०२० मध्ये मार्च ते डिसेंबरपर्यंत नेत्रशस्त्रक्रिया बंद होत्या.
डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत ४९५ शस्त्रक्रिया झाल्या
जिल्हा रुग्णालयात महिन्याला ३५० ते ४०० शस्त्रक्रिया होत होत्या.
--
डमी - नेट फोटो
आय
११आय ऑपरेशन डमी