अहमदनगर : केंद्र सरकारविरोधात शहर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ यांच्या गटाने वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर, तर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिका-यांनी मार्केट यार्ड येथे आंदोलन केले. शहर काँग्रेसची एकाच मागणीसाठी दोन आंदोलने शहरातील चर्चेचा विषय ठरला आहे.
शेतकरी व कामगारविरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली. काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी किरण काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या बाळासाहेब भुजबळ यांच्यासह उबेद शेख, आऱ आऱ पिल्ले यांच्यासह महिला पदाधिका-यांनी वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे धरले.
काही वेळाने किरण काळे, जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक डॉ़ अनिल भांबरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण हेही आंदोलन करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आले. ते येण्यापूर्वीच तिथे भुजबळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी धरणे धरले होते. या आंदोलनात काळे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले नाही. ऐनवेळी आंदोलनाची जागा बदलण्याची नामुष्की काळे यांच्या गटावर आली.
पक्ष निरीक्षकांसमोरच काँग्रेसचे दोन गटकाँग्रेसचे जिल्हा पक्ष निरीक्षक डॉ़ अनिल भांबरे हेही नगर दौ-यावर आले होते. तेही आंदोलनात सहभागी झाले. परंतु, त्यांच्यासमोरच शहर काँग्रेसमध्ये दोन गट पडले. दोन्ही गटांनी स्वतंत्र आंदोलने केल्याने शहर काँग्रेसची ही आंदोलने शहरातील चर्चेचा विषय ठरला आहे.