श्रीगोंदा : अहमदनगर दक्षिण युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्मितल वाबळे यांच्या निवडीवर युवक काँग्रेसचे प्रभारी हरपालसिंग यांनी स्थगिती दिली दिली. या संदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्हा युवक काँग्रेसमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे.
आखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. बी. श्रीनिवास यांची मान्यता घेऊन अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी स्मितल वाबळे यांची निवड केलेली आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ‘लोकमत’ बोलताना दिली. त्यामुळे स्मितल वाबळे यांना दिलासा मिळाला आहे. काँग्रेस पक्षातील निवडीबाबत मत मांडण्याचा अधिकार पदाधिकाऱ्यांना आहे. पण पक्षाच्या इमेजवर कोणताही पध्दतीने परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असेही तांबे यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात श्रीगोंद्यात युवक काँग्रेसचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले व स्मितल वाबळे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर स्मितल वाबळे यांची युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावर ओगले गटाने दिल्लीत हरपालसिंग यांचे कार्ड वापरून स्मितल वाबळे यांची निवडीस स्थगिती असा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल केला आणि थोरात गटाला चेकमेट देण्याचे काम केले. मात्र महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सत्यजित तांबे यांनी स्मितल वाबळे यांच्या निवडीचे समर्थन करून पक्षातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण मोडून काढले आहे.