अहमदनगर : राज्यात अहमदनगर जिल्हा बँकेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळेच साखर कारखाने, दूध संघ अशा एक ना अनेक संस्था बँकेच्या योगदानातून उभ्या राहिल्या. मागील वर्ष साखर कारखानदारीसाठी अडचणीचे होते. यंदा मात्र साखरेला चांगला भाव मिळत आहे. यामुळे कारखान्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी प्राधान्य द्यावे. बँक प्रशासन, संचालक मंडळानेही त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संचालकांना दिल्या.
जिल्हा बँकेची ६४ वी सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाईन झाली. यावेळी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के, भानुदास मुरकुटे, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, करण ससाणे, अंबादास पिसाळ, राहुल जगताप, गणपत सांगळे, प्रशांत गायकवाड, अमोल राळेभात, माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर, रामदास वाघ, अनुराधा नागवडे, सचिन गुजर, काकासाहेब तापकीर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी सभागृहात उपस्थित होते, तर इतर सदस्यांनी सभेस ॲानलाईन हजेरी लावली.
मंत्री थोरात म्हणाले की, बँकेचा कारभार आतापर्यंतच्या संचालक मंडळांनी व्यवस्थित पाहिला. आता या संचालक मंडळानेही त्या लौकिकात भर टाकून उत्कृष्ट काम करून दाखवावे. बँकेने अनेक संस्थांना कर्जरूपी मदत केलेली आहे. विशेषत: साखर कारखानदारी उभारणीत बँकेचा वाटा मोठा आहे. यंदा साखरेचे भाव चांगलेे असल्याने कारखान्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेत फेडावे. संचालक मंडळ व प्रशासनानेही वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून बँकेच्या योगदानास हातभार लावावा. नगर जिल्हा व केेरळात कोरोना रुग्णांची वाढ दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप संपलेला नाही. परिणामी काम करताना बँक कर्मचारी व संचालक मंडळाने काळजी घ्यावी, असे थोरात म्हणाले.
----------
कर्ज वाढले, गुंतवणुकीत घट
यंदा बँकेच्या कर्जवाटपात वाढ झाल्याने तसेच ठेवीवरील व्याजदरात घट झाल्याने गुंतवणुकीत घट झाली असली, तरी खेळते भांडवल व नफ्यात वाढ झाल्याचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांनी सांगितले. २०१९-२०च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये नफा वाढून ४२ कोटी ५४ लाख झाला आहे. खेळते भांडवल १० हजार ७७० कोटी आहे. ठेवी ८ हजार ३६४ कोटी आहेत. यासह नाबार्ड अल्प व्याजात घेण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम १ हजार ४०० कोटीपर्यंत पोहोचली आहे. तसेच कर्ज वाटप वाढल्याने गुंतवणूक मात्र एक हजार कोटींनी कमी झाली आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून, एकूण एनपीए हा ५.५४ टक्के असल्याची माहिती शेळके यांनी दिली.
---------------
फोटो - २५एडीसीसी
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा शनिवारी झाली.