अहमदनगर: आपआपल्या राजकीय पक्षांच्या भूमिका बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या २१ जागा बिनविरोध करण्यावर जिल्ह्यातील नेत्यांचे एकमत झाले होते. त्यासाठी विखे- थोरात गटात समझोता करण्याचा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी प्रयत्नही केला. परंतु, त्यांचा प्रयत्न फसला आणि अखेर चार जागांसाठी निवडणूक लागली. याशिवाय भाजपला आपले उमेदवार बिनविरोध करण्यात फारसे यश आले नाही. जिल्हा बँकेतील हे अपयश भाजपाच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी मात्र जिल्हा बँकेबाबत कर्डिले यांचे नाव पुढे केले आहे. भाजपकडून कर्डिले यांच्यावरच जबाबदारी होती. तेच चर्चेसाठी जात होते, असे विधान विखे यांनी गुरुवारी नगरमध्ये केले. दरम्यान कर्डिले यांनीही, ‘हो जबाबदारी माझ्यावर होतीच, मी नाकारत नाही. थोरात व विखे यांच्यात समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या २१ जागा बिनविरोध करण्यास दोघांचीही मान्यता होती. मात्र सर्वांचेच समाधान करणे शक्य झाले नाही. चार जागांवर निवडणूक लागली’ अशी खंत कर्डिले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. यावरून जिल्हा बँकेतील भाजपाचे हे अपयश नेमके कुणाचे ? कर्डिलेंचे की विखेंचे, यावरून पुढील काही दिवस नगरकरांचे मनोरंजन होणार आहे.
...
जिल्हा बँकेची जबाबदारी कर्डिलेंवरच- विखे
जिल्हा बँक निवडणुकीबाबत खासदार डॉ. सुजय विखे यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता विखे म्हणाले, जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक पार पडू द्या, त्यानंतर याबाबत बोलेन, असे सांगतानाच भाजपकडून सर्व जबाबदारी कर्डिले यांच्यावर होती. काही जागांसाठी राजकीय तडजोडी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. ते चर्चेसाठी गेले होते. इतर सर्व मुद्यांबाबत निवडणूक निकालानंतर भूमिका मांडणार आहे. मला कुणाला घाबरायचे कारण नाही. निकालानंतर टीकाटिप्पणी होईल आणि तीही जाहीरपणे होईल, यात शंका नाही, असे विखे यांनी स्पष्ट केले.
.....
जबाबदारी नाकारत नाही- कर्डिले
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. बँकेत राजकारण करायचे नाही, या एका मुद्यावर सर्वांचे एकमत होते. त्यासाठी विखे- थोरात यांच्यात मध्यस्थी करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ती मी पार पाडली. सर्व जागा बिनविरोध करण्यासाठी महसूलमंत्री थोरात यांची भेट घेतली व बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला. त्यांनीही मान्यता दिली. पण, ही मान्यता देताना त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून सांगतो, असे सांगितले. तसा निरोप माजीमंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डाॅ. सुजय विखे यांना दिला होता. त्यांनीही मान्यता दिली होती. परंतु, सर्वांचे समाधान झाले नाही. त्यामुळे चार जागांसाठी निवडणूक लागली. स्थानिक राजकारणामुळे या चार जागांवर निवडणूक घ्यावी लागली. यामुळे बँकेचा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे, असेही कर्डिले म्हणाले.
...