अहमदनगर : जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या नावाने कोरोनाबाबत जिल्हाभर बनावट संदेश फिरतो आहे. सोशल मीडियावरील या संदेशाने नागरिकांनांही धास्ती भरली आहे. हा संदेश खरा आहे की खोटा? याची पडताळणी न करता नागरिकांकडून तो फॉरवर्ड केला जात आहे. या चुकीच्या संदेशाने जिल्ह्यात चिंता वाढवली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार असून नागरिकांनी काय दक्षता घ्यायची? याबाबतच्या १७ प्रकारच्या सूचना या संदेशात देण्यात आल्या आहेत. ‘अहमदनगर कलेक्टर यांनी दिलेल्या सूचना’, ‘जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचना’ किंवा संदेशाच्या शेवटी ‘जिल्हा माहिती कार्यालय’ यांच्या नावाने हा संदेश सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. संदेशामधील सूचना या शास्त्रीयदृष्ट्या मान्य आहेत का?, तसेच कोणतीही अधिकृतता या संदेशाद्वारे देण्यात आलेली नाही. या संदेशामुळे नागरिकांना चुकीची माहिती जात आहे. त्याबद्दल आता कोणाला जबाबदार धरणार? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
विशेष म्हणजे हा बनावट संदेश सोशल मीडियावर फिरत असूनही प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. या अफवाखोरांवर अद्याप कारवाई करण्याचा साधा इशार किंवा खुलासाही प्रशासनाने दिलेला नाही. त्यामुळे अशा अफवा पसरविणा-यांना प्रशासन काही कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे.