अहमदनगर : शहरातील कोठला परिसरातील वंजार गल्ली येथे झेरॉक्सच्या दुकानात चक्क बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता पोलिसांनी या दुकानावर छापा टाकून दोघांना अटक करत ४१ हजार रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.वंजार गल्लीतील झेरॉक्सच्या दुकानात बनावट नोटा तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिटके यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने या झेरॉक्सच्या दुकानात छापा टाकून तपासणी केली. यावेळी दुकानात लपवून ठेवलेल्या १००, २००, ५०० व २ हजार रूपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. कलर झेरॉक्स, प्रिंटर व कॉम्प्युटरच्या माध्यमातून या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बनावट नोटांसह या नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. या दुकानात कधीपासून बनावट नोटा तयार केल्या जात होत्या तसेच या नोटांचे कुठे वितरण केले जात होते याबाबत पोलीस ताब्यात घेतलेल्या दोघांची कसून चौकशी करत आहेत. पुढील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत आरोपींची नावे उघड केली नव्हती. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तसेच नगर शहरात इतर कुठे अशा पद्धतीने नोटा तयार केल्या जातात का याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, या बनावट नोटा चलनात आणल्या आहेत का? याबाबतही माहिती घेतली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कॉन्स्टेबल राम सोनवणे, अभिजित अरकल, खंडागळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
नगरमध्ये बनावट नोटांचा छापखाना; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 11:15 PM