जिल्हा बँकेने मागील कालावधीत मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतच कर्ज बिगरव्याजी देण्याची घोषणा केली. जिल्हाभर सत्कार स्वीकारले; मात्र सेवा सोसायटींनी सहा टक्के दराने कर्ज भरण्यास शेतकऱ्यांना सांगितले आहे. गतवर्षी भरलेले सहा टक्के व्याज पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, असेही सांगितले जात होते; मात्र अद्यापही ही व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालीच नाही.
याबाबत जिल्हा बँकेने परिपत्रक काढून सभासद पातळीवर कर्ज वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. शिवाय यंदा पाऊस चांगला झाला आहे, म्हणून वसुली जोरदार झाली पाहिजे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेलवर निवेदन पाठवून सोसायटीकडून व्याज वसूल करू नये व नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना तत्काळ कर्ज मिळावे, अशी मागणी केली आहे.