प्रमोद आहेर / शिर्डी : कोरोनाने साईनगरीत शिरकाव केला. या आजारात कुणा एकाची नाही तर सगळ्या शहराचीच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी साईनगरीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते सरसावल्या आहेत. त्यांचे अवघे कुटूंबच त्यांच्या या प्रयत्नांचा भाग बनले आहे.
गेल्या चार दिवसात दोन रूग्ण सापडल्याने सगळे शिर्डीकर हवालदिल झाले आहेत. प्रशासन व कोरोना योद्धे वगळता सर्व जण घरात बसून आहेत. नगराध्यक्षपदाच्या रूपाने सगळ्या शहराची आई असलेल्या नगराध्यक्षा अर्चना कोते मात्र या संकटावर मात करण्यासाठी सरसावल्या आहेत.
माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शहरातील प्रत्येक घराघरात मोफत होमिओपॅथीच्या आर्सेनिक ३० या गोळ्या पोहोचवण्याचा चंग बांधला आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार या गोळ्या कोरोनावर उपचार करणार नसल्या तरी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवून कोरोनाला रोखू शकणार आहेत.
अर्चना कोते यांची मुलगी होमिओपॅथीची डॉक्टर आहे. साईनगरीतीलच माहेर असलेल्या डॉ. वृषाली रविशंकर गोंदकर या कामात आईच्या मदतीला आल्या आहेत. आईच्या प्रयत्नांना लेकीच्या ज्ञानाची मदत होत आहे. सध्या नगराध्यक्षांच्या निवासस्थानाला होमिओपॅथी दवाखान्याचे स्वरूप आले आहे.
वृषाली यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचे सर्व नियम पाळत गोळ्यांच्या डब्या भरल्या जात आहेत. यासाठी अर्चना कोते यांचे पुत्र व सामाजिक कार्यकर्ते नितीन उत्तमराव कोते, सुन सायली, नातू युग, पुतण्या केतन हे सगळे झटून कामाला लागले आहेत. गोळ्या भरलेल्या डबीत डॉ.वृषाली स्वत:च्या हाताने योग्य त्या प्रमाणात औषधाची मात्रा टाकत आहेत. या बरोबरच तयार झालेल्या डबीवर सूचना लिहिणे, कागदी पाकीटात बंद करणे, त्याचे वितरण आदी कामेही सुरू आहेत.