अहमदनगर: हॉटेलमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे तपासणीत समोर आले. संबंधित हॉटेलमालकांना महापालिकेने नोटिसाही बजावल्या. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी असे पत्र मनपाने दिले. मात्र दोन्ही विभागाकडून प्रत्यक्षात कोणतीच कारवाई झालेली नाही. एकूणच अशुध्द पाण्यावरील कारवाईचा हा केवळ फार्स ठरला आहे.नगर शहरात मलेरिया, कावीळसारख्या साथ रोगाची हजारो नागरिकांना लागण झाली. अख्ख्या शहराला साथ आजाराने विळखा घातल्यानंतर महापालिकेला जाग आली. त्यानंतर साथ रोग रोखण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने शहरातील हॉटेलमधील पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. त्यात २० हॉटेलमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले. क्लोरिनेशन करून मगच पाणी पिण्यास वापरावे अशी नोटीस महापालिकेने हॉटेलमालकांना दिली. संबंधित हॉटेल मालकांवर कारवाई करावी असे पत्र महापालिकेने अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले. महापालिकेला हॉटेलवर कारवाईचा अधिकार नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. कायद्यानुसार महापालिकेने कारवाई केली नाही. अन् ज्यांना कारवाईचे अधिकार आहेत त्या अन्न व औषध प्रशासन विभागालाही कारवाई करण्यास वेळ नाही. सगळेच पाणी दूषितमहापालिका पाणी पुरवठा करतेवेळी नागरिकांना क्लोरिनेशन करूनच पाणी पुरवठा करते. शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होतो. साठा केलेल्या पाण्यातील क्लोरिनेशन उडून जाते. त्यामुळे दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांना येते. साठा केलेल्या पाण्यात क्लोरिनेशन राहत नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. ... तर आयुक्त कारवाई करू शकतातमहापालिका अधिनियमानुसार साथ रोग पसरविणाऱ्या हॉटेलविरुध्द कारवाई करण्याचे अधिकार आयुक्तांनाही आहेत. पण ही कारवाई करताना त्याच हॉटेलमधील पाण्याने साथ रोगाचा प्रसार होतो हे महापालिकेला सिध्द करावे लागेल. या फंदात पडण्यापेक्षा कारवाई न केलेलीच बरी अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. हे आहेत उपायहॉटेलमधील पाण्यात मेडिक्लोर टाकून क्लोरिनेशन करणे शक्य आहे. हे करता आले नाही तर फिल्टर करूनच ग्राहकांना पाणी दिले पाहिजे. दोन्हीपैंकी एक प्रक्रिया केली तरी क्लोरिनेशन केलेले पाणी ग्राहकांना मिळू शकते. मात्र हॉटेलवाले यातील काहीच करत नसल्याचे सांगण्यात आले.
अशुध्द पाण्यावरील कारवाईचा फार्स
By admin | Published: September 11, 2014 11:16 PM