जामखेड : सतत नापिकी, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने घरातच विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना जामखेड तालुक्यातील नान्नज येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
बाळू बाबूराव मोहळकर (वय ४७) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. १ मार्च रोजी शेतकरी बाळू मोहळकर यांनी सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या पांढरीचा मळा या शेतातील राहत्या घरी विषारी औषध घेतले. त्यांना उलटी होऊ लागल्याने त्यांनी आपल्या घरातील नातेवाइकांना सांगितले. त्यांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहावर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नान्नज येथील पांढरी मळा या ठिकाणी त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. मृत मोहळकर यांच्याकडे बँक कर्ज होते. ते नापिकीने परेशान झाले होते. नुकत्याच त्यांच्या दोन गायींचा तापाच्या आजाराने मृत्यू झाला होता. यातही त्यांचे नुकसान झाले होते. याच चिंतेतून त्यांनी आत्महत्या केली असावी, असे कुटुंब, ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या मागे वृद्ध आई, पत्नी नीता, मुलगा महेश, मुलगी नीता असा परिवार आहे.