श्रीरामपूर : तालुक्यातील खानापूर येथे एका शेतक-याने विष प्राशन करुन कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक तात्याबा आदिक (वय ४६) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे.
२२ जून रोजी डाळिंबाच्या बागेत अशोक आदिक याने विषप्राशन केले होते. त्यानंतर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे शेतक-याची प्राणज्योत मावळली.
याप्रकरणी तालुका पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस शेतक-याच्या कर्जासंबंधी माहिती घेत आहेत. त्यांच्या पश्चात आई, मुलगा, सुन, नातवंडे, दोन अविवाहित मुली असा परिवार आहे.