अकोले : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यासाठी एका ओढ्यावर पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका शेतक-याच्या मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील म्हाळादेवी शिवारातील ठाकरवाडी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.
चंद्रभान परशुराम हासे (वय ६१, रा. म्हाळादेवी, ता. अकोले) या मृत्यू झालेल्या शेतक-याचे नाव आहे. या शेतक-याचा मृतदेह कुजलेल्यास्थितीत आढळून आला आहे.
या घटनेची पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळीच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन केला. तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेली आठ-नऊ दिवसांपासून चंद्रभान हे बेपत्ता होते. तीन दिवसांपूर्वी घरातील लोकांनी अकोले पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली होती. शनिवारी सकाळी त्यांच्या घरापासून जवळ ३००-४०० मिटर अंतरावर पाच वर्षांपासून कामबंद असलेल्या कालवे पुलाच्या खड्ड्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, म्हाळादेवी ग्रामस्थांनी या पुलाचे काम अर्धवट करणा-या ठेकेदरावर संदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तहसीलदाराकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.