बाभळेश्वर : शेतामध्ये पिकाला पाणी पाणी देत असताना बिबट्याने युवकावर हल्ला केल्याची घटना राजुरी येथे शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी)सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे. राहाता तालुक्यातील राजुरी गावाच्या शिवेला पाण्याच्या तळ्याजवळ काही लोकवस्ती आहे. येथे काही शेतक-यांची शेती आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान बाभळेश्वर येथील युवक महेश सुधाकर बेंद्रे याची गट नंबर २११ मध्ये शेती आहे. यामध्ये गहू व मकाचे पीक असल्यामुळे महेश शुक्रवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतात असणा-या मका पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. पाणी भरण्याचे काम चालू असताना मोटारीचे पाणी कमी पडले म्हणून म्हणून तो आपल्या गव्हाच्या शेतामधून मोटार चालू करण्यासाठी जात विहिरीकडे असताना मागून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला. प्रथम या बिबट्याने महेशच्या पायाला पकडले. महेशने कशीतरी त्याच्या तावडीतून्न सुटका केली. परंतु नंतर बिबट्याने परत त्याच्या मानेजवळ पकडण्याचा प्रयत्न केला. महेशने त्याच्याशी प्रतिकार करुन कशीबशी सुटका करून घेतली. यानंतर महेशने आरडाओरड करून जवळच्या वस्तीकडे धाव घेतली. येथे शेतकरी गोकुळ गोरे व अन्य शेतक-यांना त्याने माझ्यावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे सांगितले. यानंतर वस्तीतील शेतकरी व महिलांनी त्याला धीर देऊन लोणी येथील सरकारी रूग्णालयात उपचारासाठी पाठिवले. या उपचारानंतर त्याला नगर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. महेश बेंद्रे यांच्या मानेला व हाताला बिबट्याने धरल्याच्या खुणा दिसत आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; राजुरी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 4:46 PM