नेवासा : मुळा सहकारी साखर कारखान्याने उसाला तोड दिली नाही, असा आरोप करत नेवासा तालुक्यातील करजगाव येथील शेतकरी अशोक टेमक यांनी गुुरुवारी शेतातच अडीच एकर उभा ऊस पेटवून दिला. विधानसभा निवडणुकीत मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात काम केल्याने कारखान्याने आमचा ऊस नेला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबीची दखल घ्यावी, अन्यथा उसातच आत्मदहन करू असा इशारा शेतकरी ऋषिकेश शेटे यांनी दिला आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही मुळा कारखाना शेतातील ऊस तोडून नेत नसल्याचा आरोप शेतकरी अशोक टेमक व ऋषिकेश शेटे यांनी केला. उसाला तोड दिली जात नसेल तर शेतातच पेटवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला होता. अशोक टेमक यांनी गुरुवारी दुपारी करजगाव येथील देवखिळे वस्ती येथील अडीच एकर ऊस पेटविला.
यावेळी शेतकरी टेमक म्हणाले, मुळा सहकारी साखर कारखान्याने पंधरा महिने चकरा मारूनही उसाची नोंद घेतली नाही. त्यामुळे उसाला तोडही मिळाली नाही. विधानसभा निवडणुकीत गडाख यांच्या विरोधात काम केल्याने आमची पिळवणूक सुरू आहे. तोड मिळत नसल्याने डोळ्यांसमोर अडीच एकर ऊस जाळावा लागत आहे.
ऋषिकेश शेटे म्हणाले, विरोधात असलेल्या शेतकऱ्यांचा हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून नेला जात नाही. त्यामुळे आम्ही शेतातच ऊस पेटविण्याचा निर्णय घेतला आहे. आज शेतातच ऊस पेटविण्यास प्रारंभ केला आहे. दर चार दिवसांनी एका शेतकऱ्याचा ऊस आम्ही पेटविणार आहोत. या बाबीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल न घेतल्यास उसातच आत्मदहन करू, असा इशारा शेटे यांनी दिला.
-----
ते शेतकरी मुळा कारखान्याचे सभासद नसूनही गेली ४० वर्षे त्यांचा ऊस आम्ही घेतो. गेल्या वर्षी नोंद असूनही त्यांनी मुळा कारखान्याला ऊस दिला नाही. इतरत्र उसाची विल्हेवाट लावली होती. यंदा त्यांनी आमच्याकडे उसाची नोंदही केली नाही. उसाची नोंद असलेल्या एकाही शेतकऱ्याची कारखान्याबाबत तक्रार नाही.
नानासाहेब तुवर,
अध्यक्ष, मुळा साखर कारखाना