अहमदनगर : शासनाने दुधाला भाव वाढवून द्यावा, या मागणीसाठी बुधवारी नगर तालुक्यातील शेतक-यांनी येथील मार्केटयार्ड चौकात आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतक-यांनी दूध रस्त्यावर ओतून सरकारी धोरणाचा निषेध केला.सामाजिक कार्यकर्ते देविदास कर्डिले मित्रमंडळाच्यावतीने या आंदोलाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले, शेतीसह दूध व्यवसाय हा शेतक-यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. जनावरांचे आरोग्य आणि चा-याचा खर्च याचा विचार करताना सध्या मिळत असलेला प्रतीलिटरमागे दूध दर अतिशय कमी आहे. शेतीपिकांसह दूधालाहा अपेक्षित भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे़. नगर जिल्ह्यातील शेतक-यांवरही मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतक-यांना दूध दर मिळावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. शासन मात्र याचा गांभीर्याने विचार करत नाही. येत्या आठ दिवसांत शासनाने दूधाला भाव वाढवून दिला नाही तर नगर तालुक्यातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा कर्डिले यांनी दिला. या आंदोलनात अविनाश जाधव, विकास निमसे, कैलास कुलट, लखन जाधव, सोमनाथ जाधव, दीपक भगत, गोरख पाडळे, राजू तरटे, दिगंबर देविकर, गणेश काळे, अभिजित जोशी, सचिन मुथियान, महेश सुपेकर, अशोक अभोल, गोरख जाधव यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात बांधणारशेतक-यांच्या प्रश्नावर शासनाला जाग आणण्यासाठी नगर तालुक्यातील शेतकºयांचे मोठे आंदोलन उभा करणार आहे. येत्या पंधरा दिवसांत सरकारने शेतक-यांच्या दुधाला योग्य दर जाहीर केला नाही तर नगर तालुक्यातील शेतकरी त्यांची जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात आणून बांधतील़ असा इशारा देविदास कर्डिले यांनी दिला आहे.