संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव सुमारे दोन हजार रुपयांनी कमी झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.०८) दुपारी आंदोलन सुरू केले आहे. शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
बाजार समितीत कांद्याला भाव मिळत असताना शुक्रवारी अचानक कांद्याचे भाव कमी झाले. आधीच शेतमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका त्यामुळे बसला आहे. अशातच कांद्याचे बाजारभाव आणखी दोन हजार रुपयांनी कमी झाल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. कांदा लिलावाच्या दिवशी बाजार समितीचे समोर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे नाशिक पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आंदोलनाची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे हे पोलीस आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत.