अहमदनगर : मागील वर्षीच्या खरिपाचे अनुदान तहसील कार्यालयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत़ मात्र महिना उलटूनही हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झिरपलाच नाही़ सरकारने दिलेले २९ कोटींचे अनुदान वाटपाविना पडून आहे़ ऐन दिवाळीतही पैसे बँक खात्यावर जमा न झाल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीवर संक्रांत आली आहे़ मागीलवर्षी जिल्ह्यात भयंकर दुष्काळ होता़ रब्बी व खरिपाचे पीक हाती आले नाही़ दोन्ही हंगाम वाया गेले़ पिकांवर केलेला खर्चही वसूल झाला नाही़ सरकारने रब्बी व खरिपाची नुकसान भारपाई दिली़ रब्बीसाठी केंद्र सरकारने १ हजार ५०० कोटी जाहीर केले़ मात्र या या निधीतून एक खडकूही अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही़ रब्बीचा निधी राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे तिजोरीत अडकून पडला आहे़ यावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नी असलेली सरकारची उदासीनता समोर आली़ त्याला प्रशासनही अपवाद नाही़ सरकारप्रमाणेच प्रशासन दुष्काळप्रश्नी उदासीनच असल्याचे खरीप अनुदान वाटपाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ सरकारने सन २०१५ मधील खरिपाचे अनुदान तीन टप्प्यात दिले़ पहिल्या दोन टप्प्यांतील निधी १०० टक्के वाटप झाला़ तिसऱ्या टप्प्यात १७ सप्टेंबर रोजी सरकारने ३१ कोटी १० लाख जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले़ जिल्हा प्रशासनाने ते तहसील कार्यालयांकडे वर्ग केले़ तहसील कार्यालयांनी ३१ कोटी पैकी २ कोटी अनुदानाचेच फक्त वाटप केले़ उर्वरित २९ कोटी २७ लाख तहसील कार्यालयांच्या खात्यावर पडून आहेत़ तहसील कार्यालयाने प्राप्त झालेल्या निधीवर गेल्या महिनाभरात कार्यवाही केली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारे पैसे महिना उलटूनही मिळाले नाही़ किमान दिवाळीत तरी खरिपाचे पैसे मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती़ परंतु, स्थानिक अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे पैसे प्रशासनाच्याच खात्यावर पडून आहेत़ शेतकरी मात्र या पैशांसाठी बँकेत चकरा मारत आहेत़ पैसे आले नाही, असे उत्तर त्यांना बँकेकडून दिले जात आहे़
शेतकऱ्यांचे २९ कोटी पडून
By admin | Published: October 27, 2016 12:32 AM