अहमदनगर : गेल्या सहा वर्षांपासून पैसे भरूनही वीजजोडणी मिळत नसल्याने नगर तालुक्यातील रांजणी येथील शेतक-याला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलीस व प्रेस क्लबच्या सदस्यांनी शेतक-याला अडवल्याने पुढील अनर्थ टळला.रांजणी येथील सखाराम लक्ष्मण ठोंबे यांची गावात चार एकर जमीन आहे. शेतातील वीजपंपासाठी वीज मिळावी म्हणून त्यांनी १० मार्च २०१२ रोजी महावितरणकडे रितसर पैसे भरून कोटेशन घेतले होते. महावितरणकडून त्यांना रितसर वीजजोडणी मिळाली, परंतु शेजारील सुधाकर पोळ व मोहन पोळ हे दोघे खांब रोवण्यासाठी प्रतिबंध करतात व त्यांनी रस्तासुद्धा अडवला आहे, असा आरोप ठोंबे यांनी केला. त्यांनी माझ्या विहिरीचे काम बंद पाडले, तसेच ते जीवे मारण्याची धमकी देतात. शासनाने याची दखल घेऊन मला वीजजोडणी मिळवून द्यावी, अशी मागणी करत ठोंबे यांनी गुरूवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर खिशातील बाटलीत आणलेले रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी तेथे उपस्थित पोलीस वसिम पठाण, सचिन गोरे व प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूरभाई शेख, महेश देशपांडे महाराज यांनी शेतक-याकडून रॉकेलची बाटली हिसकावून घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्या शेतकऱ्याच्या खिशात तीन काडीपेट्याही आढळल्या. त्यानंतर गृह शाखेत नेऊन रितसर निवेदन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:39 PM