पागोरी पिंपळगाव : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यामुळे सर्व हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांना दिलासा देत तातडीने नुकसानीची पाहणी व पंचनामे करूनही अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील व्यापार, उद्योगावर परिणाम झाला. शेतमालाची विक्री करता न आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली. अशा अवस्थेत कोरोनाशी झुंज देत शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत, अपार कष्ट घेत पिके उभारली. मात्र, त्यावरही निसर्गाची अवकृपा झाली. पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतातील कांदा, सोयाबीन, कापूस, डाळिंबासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, असे शेतकरी सचिन कचरे यांनी सांगितले.
-----------------
जात पडताळणीच्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन
पागोरी पिंपळगाव : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, चितळी, हनुमान टाकळी, तसेच इतर गावांमध्ये
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांत कमालीचा उत्साह दिसून येत आहे. यातूनच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे ऑनलाईन अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. याचा परिणाम ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी असलेल्या ‘सीसीव्हीआयएस’च्या वेबसाइटचे सर्व्हर डाऊन होत आहे. यातूनच काही ठिकाणी अर्ज दाखल होऊन पैसे कपात झाले तरी त्याची पावती तयार (जनरेट) होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.