शेवगाव : येथील नेवासा रोडवरील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्राला संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.३) रोजी सकाळी टाळे ठोकले. ऊस तोडणीचे नियोजन होत नसल्याने हे आंदोलन केले.
भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, पंचायत समिती सदस्य नंदू वाघमारे, आखतवाडेचे सरपंच बाळासाहेब बडे. हरिभाऊ ऊगले आदीसह संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ऊस खरेदी केंद्राला कुलूप लावून तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या.
यावेळी बाळासाहेब सोनवणे म्हणाले, उसासंदर्भात चौकशी करण्यासाठी शेतकरी गेले असता उसाच्या नोंदी रजिस्टरमध्ये खाडाखोड, नोंद बुक हरवले, स्लिप बुक हरवले अशी उत्तरे येथील कर्मचारी, अधिकारी देत आहेत. ऊसतोडणीसाठी अधिकारी, टोळी, मुकादम गावपुढारी, ऊस वाहतूक करणारा चालक, मालक यांच्याकडून अरेरावी, दडपशाहीची भाषा वापरली जाते, असा शेतक-यांचा आरोप आहे.